खानदेशी मिरच्यांची भाजी

12800376_508436129363111_6890134830926723097_nजळगाव, धुळे, अमळनेर, नंदुरबार हा सगळा भाग म्हणजे खानदेश. इथली खाद्यसंस्कृती इतकी मस्त झणझणीत आहे की बस्स! कदाचित म्हणूनच या प्रदेशाचं नाव खानदेश तर पडलं नसेल ना?!! या भागातलं डायरेक्ट विस्तवावर भाजलेल्या वांग्याचं भरीत, माठात केली जाणारी तूप-लसूण-मिरची-दगडफूल वापरून केली जाणार कढी, शेवेची मटन मसाला वापरून केली जाणारी, नाक-तोंडातून पाणी काढणारी भाजी असे अस्सल पदार्थ म्हणजे खवय्यांना मेजवानीच. खानदेशी खाद्यसंस्कृती ज्या पदार्थाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही असा पदार्थ म्हणजे मिरचीची भाजी. आता कुणाला वाटेल मिरच्या म्हणजे सिमला मिरच्या. पण नाही, या मिरच्या म्हणजे अस्सल, ताज्या हिरव्या मिरच्या. खरं तर हा पातळ भाजीचा किंवा आमटीचा प्रकार आहे. अतिशय झणझणीत पण अतिशय चवदारही. एकदा खाल्लात की परत परत खाल.
ही भाजी मी सगळ्यात पहिल्यांदा खाल्ली ती औरंगाबादला आईची एक मैत्रीण होती नाफडे आडनावाची, त्यांच्या घरी. त्यांच्या घरची ती पंगत मला अजून आठवते आहे. आम्ही सगळे मस्त मांडी घालून खाली जमिनीवर बसलो होतो. समोर ताटात गरमागरम भाकरी, ठेचा, चिरलेलं मुळा, काकडी, टोमॅटो, कांदा, लिंबू, बरोबर थंड ताक आणि वाटीत मस्त हिरवीगार मिरचीची भाजी. मी तेव्हा ती पहिल्यांदा खाल्ली आणि नंतर मग साहित्य सहवासात आमच्या एका मैत्रिणीकडे बरेचदा खाल्ली. तिचा नवरा अशोक तर ही भाजी फारच सुंदर करतो. फरक इतकाच आहे की मी आमच्या घरातल्या लोकांची चव ओळखून पोपटी रंगाच्या कमी तिखट मिरच्या वापरते तर अशोक लवंगी मिरच्या वापरतो. पण लवंगी मिरच्यांमुळे ही भाजी फर्मास लागते.

मिरचीची भाजी

साहित्य – १ वाटी तूरडाळ, साधारण एक वाटीच तुकडे होतील इतक्या हिरव्या मिरच्या (आपल्या आवडीप्रमाणे पोपटी किंवा लवंगी. पण मिरच्या अख्ख्याच ठेवायच्या आहेत), १ जुडी आंबट चुका किंवा चुका मिळाला नाही तर ३ हिरवे टोमॅटो, २ मध्यम आकाराची काटेरी वांगी, ७-८ लसूण पाकळ्या आणि १ इंच आलं यांची पेस्ट, १ टेबलस्पून सुकं खोबरं, २ कांदे बारीक चिरून, थोडी कोशिंबीर बारीक चिरून, २ टीस्पून काळा मसाला, प्रत्येकी १ टीस्पून धणे-जिरे पूड, १ टेबलस्पून तेल, मोहरी, हिंग, हळद, मीठ चवीनुसार

कृती –
१) तूरदाळ स्वच्छ धुवून एका भांड्यात घ्या. वांग्याचे आणि टोमॅटोचे मोठे तुकडे करून त्यात घाला. चुका मिळाला तर उत्तमच. मग टोमॅटोऐवजी तो वापरा.
२) त्यात अख्ख्या हिरव्या मिरच्या घाला.
३) तूरडाळीत नेहमीसारखं दुप्पट पाणी घालून कुकरला मऊ शिजवून घ्या.
४) डाळ गरम असतानाच घोटा. नको असतील तर घोटण्याआधी मिरच्या काढून टाका. अशोक किंवा मी काढून टाकत नाही.
५) एका कढईत तेल गरम करा. नेहमीसारखी मोहरी-हिंग-हळद घालून फोडणी करा.
६) त्यात कांदा घालून चांगला मऊ शिजू द्या.
७) नंतर त्यात आलं-लसूण पेस्ट घालून २-३ मिनिटं चांगलं होऊ द्या. त्यातच सुकं खोबरं आणि कोथिंबीर घाला.
८) हे सगळं मिश्रण चांगलं परतलं की घोटलेली डाळ घाला. चांगलं हलवून आपल्याला हवं तसं घट्ट-पातळ ठेवा. ही भाजी जराशी घट्टच असते.
९) आता त्यात काळा मसाला, धणे-जिरे पूड आणि मीठ घाला. चांगलं हलवून घ्या.
१०) मध्यम आचेवर उकळी येऊ द्या. भाजी चांगली उकळली की गॅस बंद करा.
मिरचीची भाजी तयार आहे.

या भाजीबरोबर भाकरी, कच्चं कांदा-काकडी-मुळा-टोमॅटो, लिंबू द्याच. भाजी खाताना लिंबू पिळून खा. त्यात भाकरी कुस्करून तर जी काय लागते ते केवळ स्वर्गसुखच! उतारा म्हणून बरोबर थंड ताक द्या. इतकी भाजी ४ माणसांना पुरते.
सोशल नेटवर्किंगवर ही पोस्ट शेअर करताना या ब्लॉगचा जरूर उल्लेख करा.

सायली राजाध्यक्ष

2 thoughts on “खानदेशी मिरच्यांची भाजी

  1. तुमच्या रेसिपी नुसार आज मिरचीच वरण बनवले. छान जमले. आंबटासाठी टमाट्या ऐवजी कैरी वापरली होती. कारण इथे बेंगलोर मधे चुका तर नाहीच पण हिरवे टमाटे भेटणं पण कठीण आहे. Thank you for recipe.😊

    Like

Leave a comment