अन्न हेच पूर्णब्रह्मचे अनेक वाचक परदेशातले आहेत. त्यातले अनेकजण पोस्ट वाचून मेसेज करतात, त्यांना एखाद्या विषयावर माहिती हवी असेल तर तसंही सांगतात. स्टिव्हन्सविल, मिशीगन इथे राहणा-या मधुरा गद्रे यांनी व्हेजिटेरियन पार्टीसाठीचे काही मेन्यू सुचवायला सांगितलं आहे. तर स्टॉकहोमला राहणा-या अमृता पाटील यांनी काही स्टार्टर्स सुचवायला सांगितलं आहे. आजची ही पोस्ट त्याबद्दलच.
मांसाहारी पदार्थ खाणारे लोक असतील तर मग खरं तर स्वयंपाक सोपा असतो. म्हणजे जर भारतीय पद्धतीनं करायचं झालं तर एखादा रस्सा – मटण, चिकन किंवा फिश असा कुठलाही, एखादं सुकं, बरोबर सॅलड आणि पोळी किंवा ब्रेड आणि भात केला की भागतं. पण शाकाहारी पदार्थांचं तसं होत नाही. शाकाहारी पदार्थांमध्ये भाज्या, कडधान्यं, डाळी, फळं या सगळ्यांचा वापर होतो. त्यामुळे पदार्थ संख्याही वाढते.
पार्टीच्या जेवणाचे मुख्य घटक कुठले? तर स्टार्टर्स, मग मुख्य जेवण आणि मग गोड पदार्थ. आजकाल ब-याच पार्ट्या या ड्रिंक्सबरोबर असतात. मग ते हार्ड ड्रिंक्स असोत किंवा मॉकटेल्स-सॉफ्ट ड्रिंक्स. तर अशा पेयांबरोबर काहीतरी खायला हवं असतं. त्यासाठी आपल्याला कोरडे पदार्थ, ताजे ओले पदार्थ, वेगवेगळी सॅलड्स असं काहीतरी करता येईल.
स्टार्टर्स
कोरडे पदार्थ
सुकी भेळ – कुरमुरे, भाजलेले दाणे, शेव असं एकत्र करून त्यात चिरलेला कांदा, बटाटा, कोथिंबीर, हिरवी मिरची असं घालून जरा चाट मसाला किंवा तिखट-मीठ घाला.
तळलेले दाणे – बेसन-हळद-तिखट-मीठ-हिंग-आमचूर असं एकत्र करून भज्याच्या पिठापेक्षा किंचित घट्ट भिजवा. त्यात शेंगदाणे घोळून मध्यम आचेवर लाल होईपर्यंत तळा. हे आधीही करून ठेवता येतील. डाळ्याचंही असंच करता येईल.
लावलेले कुरमुरे – कुरमुरे कुरकुरीत भाजून घ्या. त्यात मीठ-मेतकूट-काळा मसाला-तिखट-कच्चं तेल घालून नीट कालवा. हवं असल्यास बारीक चिरलेला कच्चा कांदा घाला.
मठरी – मैदा-ओवा-जिरं-मीठ-हिंग असं एकत्र करा. तेलाचं मोहन घालून घट्ट पीठ भिजवा. लहान लहान पु-या करा. त्याला टोचे मारून मंद आचेवर कडक होईपर्यंत तळा. हाही पदार्थ आधी करून ठेवता येईल.
तिखट-मिठाचे शंकरपाळे – मैद्यात जरा जास्त तुपाचं कडकडीत मोहन घालून नीट मिसळून घ्या. त्यात तिखट-मीठ-ओवा-बारीक चिरलेली कोशिंबीर-हिंग-हळद घालून पीठ घट्ट भिजवा. जरा जाड पोळी लाटून शंकरपाळे कापा किंवा अगदी लहान झाकणानं लहान लहान पु-या कापा. मंद आचेवर कडकडीत तळा. याही आधी करून ठेवता येऊ शकतात. कोथिंबिरीएवजी मेथी घालता येऊ शकेल.
शिवाय नेहमीचं चिवडा, चकली, शंकरपाळी, शेव हेही ठेवता येईल.
काही सॅलड्स
पास्ता सॅलड – मॅकरोनी उकडून घ्या. थंड झाल्यावर त्याला तेलाचा हलका हात लावून मोकळी करून ठेवा. गाजराच्या चकत्या करून त्याचे चार तुकडे करा. कांद्याची पात कांद्यांसकट बारीक चिरा. सिमला मिरची बारीक चिरा. कॉर्न दाणे उकडून घ्या. हे सगळं साहित्य एकत्र करा. त्यात मीठ-पिठी साखर-मिरपूड-लिंबाचा रस-ऑलिव्ह ऑइल घाला. थंड करून सर्व्ह करा.
चटपटे चणे – ब्राउन रंगाचे चणे भिजवून, उकडून घ्या. पाणी काढून कोरडे होऊ द्या. त्यात बारीक चिरलेलं कांदा-टोमॅटो-हिरवी मिरची-कोथिंबीर घाला. वरून थोडं लाल तिखट-मीठ-लिंबाचा रस घाला.
मुगाचं सॅलड – हिरवे मोड आलेले मूग जरासे उकडून घ्या. लगदा करू नका. त्यात बारीक चिरलेलं कांदा-टोमॅटो-कोथिंबीर घाला. तिखट-मीठ-लिंबाचा रस घाला. आवडत असल्यास थोडी चिंचेची चटणी घाला. हे सॅलड तसंच खा किंवा कॅनपीजमध्ये अथवा पाणीपु-यांच्या पु-यात भरून सर्व्ह करा.
मिश्र भाज्या-पनीर सॅलड – आइसबर्ग लेट्यूस हातानं मोकळं करून स्वच्छ धुवून कोरडं करा आणि फ्रीजरला गार करायला ठेवा. काकडीची सालं काढून मोठे तुकडे करा. बेबी टोमॅटो असतील तर अख्खे वापरा. नसतील तर टोमॅटोच्या बिया काढून मोठे तुकडे करा. पनीरचे चौकोनी तुकडे करा. सिमला मिरचीचे मोठे चौकोनी तुकडे करा. हे सगळं एकत्र करा. त्यात स्लाइस केलेले ब्लॅक ऑलिव्ह घाला. वरून लिंबाचा रस-ऑलिव्ह ऑइल-मीठ-मिरपूड घाला. हलक्या हातानं एकत्र करा. अगदी सर्व्ह करताना थंड लेट्यूसचे हातानं तुकडे करून त्यात घाला.
मूग-सिमला मिरची-कोबी सॅलड – सिमला मिरची पातळ लांब चिरा. त्यात लांब पातळ चिरलेला कोबी घाला. त्यात मोड आलेले मूग घाला. चाट मसाला-मीठ-लिंबाचा रस घाला. हवं असल्यास थोडं ऑलिव्ह ऑइल घाला. यात सगळ्या रंगाच्या सिमला मिरच्याही वापरता येतील.
चटपटा कॉर्न – कॉर्न दाणे उकडून घ्या. थंड झाले की त्यात बारीक चिरलेला उकडलेला बटाटा, हिरवी मिरची घाला. मीठ आणि लिंबाचा रस घाला. अगदी सर्व्ह करताना त्यात जरा तिखट शेव घाला. तिखट नको असल्यास साधी शेव घाला.
मिश्र सॅलड – काकडी-सिमला मिरची-टोमॅटो-गाजरं सगळं मध्यम आकारात चौकोनी चिरा. त्यात अक्रोड, काजू, भाजलेल्या बदामाचे तुकडे घाला. थोडासा खजूर चिरून घाला. बेदाणे घाला. लिंबाचा रस आणि मीठ घाला.
आपली कल्पनाशक्ती वापरून असं कसलंही सॅलड करता येऊ शकतं.
काही ताजे पदार्थ
मिश्र डाळींचे वडे – हरभरा-उडीद-मूग अशा डाळी किंवा आपल्याला हव्या त्या डाळी आपल्याला हव्या त्या प्रमाणात भिजवा. वाटताना त्यात आलं-लसूण-मिरची घालून जरा जाडसर वाटा. त्यात बारीक चिरलेला कांदा-भरपूर कोथिंबीर-बारीक चिरलेला कढीपत्ता-मीठ-तिखट-हळद-भरडलेले धणे असं घाला. लहान लहान वडे तळा.
मिनी वडे – उडीद डाळ आणि त्याच्या निम्मी मूग डाळ भिजवा. वाटून त्यात ओल्या खोब-याचे लहान पातळ तुकडे, बारीक चिरलेली मिरची, अख्खे मिरीदाणे, बारीक चिरलेला कढीपत्ता घाला. मीठ घाला. लहान लहान वडे तळा.
मिनी बटाटेवडे – बटाटे उकडून मॅश करा. त्यात आलं-लसूण-मिरची वाटून घाला. भरपूर कोथिंबीर घाला. बारीक चिरलेला कांदा घाला. मीठ आणि लिंबाचा रस घाला. लहान लहान गोळे करा. बटाटेवड्यांना करतो तसं पीठ भिजवून त्यात हे वडे घोळून तळा. किंवा थोड्या तेलावर कांदा परतून, त्यात वाटण घालून परता. त्यात उकडलेला बटाटा, मीठ, लिंबाचा रस घाला. बाकी कृती तशीच करा.
कोथिंबीर वडी – भरपूर कोथिंबीर धुवून चिरा. त्यात तिखट-मीठ-हळद-धणे पूड-जिरे पूड-साखर-तीळ घाला. थोडं लसूण-मिरची वाटून घाला. थोडा वेळ ठेवा. त्यात मावेल तसं बेसन घालून रोल करा. कुकरला उकडून घ्या. कापून तसेच खा किंवा हिंग-मोहरीची फोडणी करून त्यात खमंग परता. किंवा वड्या कापून तळा.
मिश्र भजी – कांदा-कोबी पातळ चिरा. बटाटा किसून घ्या. फ्लॉवरचे लहान तुरे काढा. या सगळ्या भाज्या एकत्र करा. त्यात तिखट-मीठ-हळद-हिंग-ओवा घाला. बेसन घाला. भज्यांच्या पिठासारखं भिजवा. थोडं कडकडीत तेलाचं मोहन घाला. लहान लहान भजी तळा.
परतलेली इडली – तयार इडली लांब पातळ चिरा. बटरवर इडली घालून खमंग लाल रंगावर परता. सर्व्ह करताना थोडं तिखट आणि चाट मसाला भुरभुरवा.
चटणी चीज सँडविच – पुदिना-कोथिंबीर-मिरची-लिंबाचा रस-मीठ-साखर-थोडं डाळं असं एकत्र वाटून चटणी करा. त्यात थोडं बटर घाला. ही चटणी ब्रेडला लावा. त्यावर थोडं किसलेलं चीज पसरवा. वर परत दुसरा स्लाइस ठेवा. लहान लहान तुकडे कापा. वरून टूथपिक लावा.
चटणी सँडविच २ – दाण्याची-तिळाची चटणी एकत्र करा. ती मिक्सरला थोडी बारीक फिरवा. त्यात थोडं दही घाला. थोडं कच्चं तेल घाला. त्यात अगदी बारीक चिरलेला कांदा घाला. हे मिश्रण ब्रेडला लावा. वर दुसरा स्लाइस ठेवा. लहान लहान तुकडे कापून वरून टूथपिक लावा.
मिनी पु-या – कणीक-थोडासा रवा आणि थोडं बेसन एकत्र करा. त्यात भरपूर बारीक चिरलेली मेथी घाला. हळद-तिखट-मीठ-तीळ घाला. लसूण-मिरचीचं वाटण घाला. कडकडीत तेलाचं मोहन घालून पीठ घट्ट भिजवा. पोळी लाटून डब्याच्या लहान झाकणानं मिनी पु-या करा. तेलात खमंग तळा. मेथीऐवजी कोथिंबीर किंवा पालकही वापरू शकता.
कॉर्न वडे – कॉर्न दाणे कच्चेच मिक्सरला भरड फिरवा. त्यात बेसन-थोडंसं तांदळाचं पीठ घाला. बारीक चिरलेलं कांदा-मिरची घाला. हळद-तिखट-मीठ घाला. लहान लहान वडे तळा.
पनीर टिक्का – पनीरचे मोठे चौकोनी तुकडे करा. थोडा वेळ दही बांधून ठेवा. नंतर का भांड्यात हा चक्का-आलं-लसूण पेस्ट-लिंबाचा रस- थोडा तयार तंदुरी मसाला-हळद-तिखट-थोडा ओवा घाला. सगळं नीट एकत्र करा. पनीरचे तुकडे त्यात घोळवा. तव्यावर किंवा पॅनमध्ये शॅलो फ्राय करा. असेच फ्लॉवरचे तुरे काढूनही करता येईल. किंवा बेबी पटेटो उकडून करता येईल. मश्रूमचंही करता येईल.
ब्रेड पकोडा – भज्यांचं पीठ भिजवा. बटाटेवड्यांसाठी करतो तसं सारण करा. ब्रेडच्या दोन स्लाइसमध्ये हे सारण भरा. एकमेकांवर घट्ट दाबा. त्याचे चार तुकडे करा. भज्यांच्या पिठात बुडवून मध्यम आचेवर तळा.
वर जे पदार्थ मी सांगितले आहेत ते तुमच्यापैकी अनेक जण करत असतीलच. परदेशातल्या लोकांना उपलब्ध साहित्यातूनच स्वयंपाक करायचा असतो. त्यामुळे शक्यतो त्यांना उपलब्ध असतील असेच पदार्थ मी यात सांगितले आहेत. या पोस्टच्या पुढच्या भागात मुख्य जेवणाचे काही मेन्यू सांगणार आहे.
सायली राजाध्यक्ष